योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : रशिया युक्रेन युद्धांमध्ये युक्रेन देशात शिकणारे भारतातील वीस हजार विद्यार्थी सुटकेसाठी याचना करत आहेत. आतापर्यंत 900 विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणण्यात आलं आहे. तर अजून अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाशिकचा राहुल अंभोरे हा विद्यार्थीदेखील आहे. पण भारतात परतण्यासाठी त्याने एक विनंती केली आहे. माझ्या श्वानाची ही सुटका करा तरच मी भारतात परत येईल असं म्हणणाऱ्या राहुलने मुक्या प्राण्यांच्या बाबतीत असलेल्या प्रेमाचा आदर्श घालून दिला आहे.


कोण आहे राहुल अंभोरे
नाशिकच्या मखमलाबाद परिसरातल्या शांतीनगरमध्ये राहणारा राहुल अंभोरे एमबीबीएस शिक्षणासाठी युक्रेनमध्ये आहे. जाताना त्याने आपल्या लाडक्या श्वानालाही युक्रेनमध्ये नेलं. यासाठी लागणारे सर्व नियमांची त्याने पूर्तता केली. 


पण आता राहुलबरोबरच त्याचा लाडका श्वानही युक्रेनमध्ये अडकला आहे. या परिस्थितीत भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. पण राहुलने आपल्याबरोबर आपल्या लाडक्या श्वानालाही पुन्हा भारतात न्या अशी याचना केली आहे.


त्याच्या पालकांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे राहुल सह त्याच्या श्वानाची सुद्धा नोंदणी केली आहे. श्वानाच्या सुटकेसाठी  विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे राहुल सोबत श्वानाला ही सोडण्याची विनंती त्याच्या पालकांनी केली आहे.