मुंबई, पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात
मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. झाली आहे.
मुंबई / पुणे : मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपरिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पहिला मानाचा समजला जाणारा कसबा गणपती मुख्य मंडपातून मार्गस्थ झाला आहे. येथील विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी देशासह राज्यभरातून लोक येत असतात. दरम्यान, मुंबईतही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पाऊस थांबल्याने उत्साहात अधिक रंगत आली आहे. मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या गणेशगल्लीच्या गणपतीची आरती नुकतीच झाली असून त्याच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे.
मुंबईसह राज्यभरात आज दहा दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईत सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत छोट्यांचाही मोठा सहभाग दिसून येतोय. नटूनथटून चिमुरडी मुलं सहभागी झाली आहेत. मुंबई गणपती विसर्जनात परदेशी नागरिकांचा देखील सहभाग पाहायला मिळत आहे. मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीच्या महागणपतीची आरती नुकतीच झाली असून त्याच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ आता लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला देखील सुरुवात होईल. दरम्यान, त्याआधी येथील स्थानिक कोळी महिलांनी बाप्पाच्या आरतीनंतर काही वेळ पारंपारिक वाद्यांवर ठेका देखील धरला.
गेले ११ दिवस जल्लोषात सुरु असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. त्यामुळे आज मुंबईसह संपूर्ण राज्यभरात लाखो गणपतींचे विसर्जन होणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात बसरणाऱ्या पावसाने कालपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होत असल्याने प्रशासनाने देखील त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईतील अनेक चौपट्या, तलावात विसर्जन केले जाते. त्यामुळे प्रशासनाने या सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था देखील ठेवली आहे. तसंच चौपट्यांवर मोठ्या प्रमाणात जीवरक्षक आणि मोटार बोट या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूरात गणरायाला निरोप
कोल्हापूरात गल्ल्यागल्यांमध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुष्पहार लावण्यात आले आहेत. तसंच कोल्हापूरातला मानाचा समजला जाणारा पहिला गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाच्या विसर्जनासाठी फुलांनी पालखी सजवण्यात आली आहे, तर रस्त्यावरही फुलांची रांगोळी घालण्यात आली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांच्या हस्ते पूजा, आरती करत पहिल्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु झाली. महापौर माधवी गवंडी, कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, आमदार सतेज पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, कोल्हापूर महानगर पालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांचीही उपस्थिती आहे. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि ढोल ताश्याच्या गजरात ही मिरवणूक सुरु आहे.