अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा 'डीएनए' आहे, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले. सध्या काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या घुसळणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली. या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, गांधी हे केवळ एक कुटुंब नाही तर तो भारताचा डीएनए आहे. जर सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडायचा निश्चयच केला असेल तर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व करायला पाहिजे. देशाला राहुल गांधी यांची गरज आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष काँग्रेसची गेलेली पत पुन्हा मिळवून देऊ शकत नाही'


काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहलेले पत्र नुकतेच समोर आले होते. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भविष्यात पक्षाला अधिक सक्रिय नेतृत्त्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. यानंतर नाराज झालेल्या सोनिया गांधी आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या पक्षाध्यक्षपदाचा त्याग करण्याची  शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेसमध्ये दोन तट निर्माण झाले आहेत. 



काँग्रेस पक्ष तुमच्या आणि राहुलजींच्या हातातच सुरक्षित; राजीव सातवांचे सोनियांना पत्र


काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी गांधी कुटुंबीयांच्या नेतृत्त्वक्षमतविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या स्वपक्षीयांवर चांगलीच आगपाखड केली होती. सोनियाजी आणि गांधी परिवाराने आजवर काँग्रेस आणि देशाला सांभाळले आहे. ज्या सो कॉल्ड बुद्धिमान नेत्यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे, त्यांनी माफी मागावी. अन्यथा त्यांना राज्यात फिरून देणार नाही, असा इशारा सुनील केदार यांनी दिला होता.