बाप्पांच्या विसर्जनासाठी भाविक सज्ज; मुंबई, पुण्यासह राज्यभर उत्साह
गेली पंधरा दिवस मनोभावे सेवा केल्यावर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा तो अवघड क्षण हळूहळू जवळ येत आहे. बाप्पांना निरोप द्यायचा या कल्पनेनेच भाविकांचे अंतकरण जड झाले आहे. अशा भावपूर्ण वातावरणात भाविक आणि गणपती मंडळाचे कार्यकर्ते बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करत आहेत.
मुंबई : गेली बारा दिवस मनोभावे सेवा केल्यावर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा तो अवघड क्षण हळूहळू जवळ येत आहे. बाप्पांना निरोप द्यायचा या कल्पनेनेच भाविकांचे अंतकरण जड झाले आहे. अशा भावपूर्ण वातावरणात भाविक आणि गणपती मंडळाचे कार्यकर्ते बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करत आहेत.
दरम्यान, बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक हा अनेकांच्या आकर्षणाचा आणि उत्साहाचा केंद्रबिंदू. त्यामुळे बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत कोणतीही कसर राहू नये, यासाठी कार्यकर्ते आणि भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. बाप्पांच्या मिरवणुकीसाठी राज्यभर उत्साह असून, पोलीस आणि प्रशासनही जोमाने कामाला लागले आहे. राज्यभरात गणपती विसर्जनाची धामधूम सुरू आहे. मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. काही ठिकाणी अतिरिक्त पोलीस दलही तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, राजधानी मुंबईतही गणपती विसर्जनासाठी चौपाट्या सज्ज झाल्या आहेत. चौपाट्यांवर सकाळपासूनच मोठी लगबग सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था चोख राहण्यासाठी मुंबईत तब्बल ४० हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर, सुमारे १०० ठिकाणी बाप्पांच्या विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही काळासाठी अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे तर, काही रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात आली आहे.
गणेशोत्सवाचे मूळ समजल्या जाणाऱ्या पुण्यातही विसर्जनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजलेपासून पुण्यातील गणपती विसर्जनास सुरूवात होईल. मानाच्या समजल्या जाणाऱ्या पहिल्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्यावर शहरातील इतर गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक संध्याकाळनंतर सुरु होईल. मिरवणूक वेळेत आणि शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केलं आहे.