Maharashtra Rain : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर आणि अपार प्रेमानंतर गणपती बाप्पा अखेर त्यांच्या गावाला जाण्यासाठी निघत आहेत. अर्थात राज्यभरात विविध ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं विसर्जन मिरवणुका सुरु झाल्या आहेत. असं असतानाच एक पाहुणासुद्धा बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज असणार आहे. हा पाहुणा म्हणजे पाऊस. हवामान खात्यानं दिलेल्याम माहितीनुसार मुंबईसह पुण्यात आणि कोकणात विसर्जनाच्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी असणार आहे. मागील चार दिवसांपासून कमीजास्त प्रमाणात सक्रिय असणारा पाऊस पुढील 24 तासांमध्ये आणखी जोर धरताना दिसणार आहे. ज्यामुळं काही भागांत मुसळधार आणि काही भागांत पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला जोर धरताना दिसला. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पावसानं हजेरी लावली आणि खऱ्या अर्थानं हा सोहळा गाजवला. ज्यानंतर आता पुढच्या 24 तासांमध्येही विदर्भात पावसाच्या तुरळक सरी तर, मुंबई पुण्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरींची हजेरी पाहायला मिळणार आहे. 


आयएमडीच्या माहितीनुसार मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पुढच्या 48 तासांमध्ये पावसासाठी पूरक वातावरण पाहायला मिळणार आहे. इथं रायगड जिल्ह्यातही काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.