कोल्हापुरकरांचा `नादखुळा` डोळ्यांवर बेतला, 65 हून अधिक तरुणांच्या डोळ्यांना इजा
पोलिसांनी सूचना देऊनही मंडळांनी त्यांचे पालन केलं नाही आणि गणेशभक्तांना त्याचा आता त्रास सहन करावा लागत आहे
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर राज्यभरात गणेशोत्सव (ganeshotsav 2022) मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात पार पडला आहे. कोल्हापुरातही (Kolhapur) विसर्जन मिरवणुकी (visarjan miravnuk) उत्साहात पार पडल्या. मात्र आता या मिरणवणुकीचे पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांनी सूचना देऊनही मंडळांनी त्यांचे पालन केलं नाही आणि गणेशभक्तांना त्याचा आता त्रास सहन करावा लागत आहे.
गणेशोत्सव काळात वापरला जाणारे लेझर डोळ्यांसाठी अतिघातक असल्याचा इशारा नेत्ररोग तज्ञांनी दिला होता. तरी देखील अनेक सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझर शोचा (laser light) वापर केला. पण आता त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत.
कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अति उत्साहात कोणताही विचार न करता विसर्जन मिरवणुकीत लेझर शोचा वापर केला. डॉल्बी आणि लेजर शो यामुळे तरुणाई देखील बेभान होऊन थिरकली. तरुणाईने लेझर शोच्या झगमगटात ठेका धरला.पण आता याच लेझरमुळे काहींच्या डोळ्यांवर गंभीर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. कोल्हापुरात आतापर्यंत 65 हून अधिक लोकांच्या दृष्टीला इजा झालीय. अनेकांना अंधुक दिसत असून काहींच्या डोळ्यात रक्त साखळलं आहे.
कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीत लेझर शोमुळे आत्तापर्यंत 65 लोकांच्या डोळ्याला इजा झाल्याचे समोर आलं आहे. मात्र यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली आत आहे. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर शो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. हाच लेझर शो आता चिंतेचा विषय ठरला आहे.
त्यामुळे आता गणेशोत्सव काळात झालेला लेझर शो किती महागात पडला आहे हे दिसून येतंय. या लेझर शोमुळे अनेकांना दृष्टीदोष निर्माण झाला आहे. तो आपोआप ठीक होईल म्हणून अद्याप काही जण उपचाराविना घरीच बसून आहेत. मात्र त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे ज्यांना ज्यांना डोळ्याचा त्रास सुरू झालाय त्यांनी तातडीने नेत्ररोग तज्ञांची संपर्क साधून उपचार करून घ्यायला हवेत नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नेत्ररोग तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान लेझर शोमुळे होणाऱ्या इजा लक्षात घेता पोलिसांनी मंडळांना त्याचा वापर करण्याची परवानगी नाकारली होती. पण काही अतिउत्साही मंडळांनी परवानगीविनाच लेझर शो केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता या मंडळांवर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे