गणपती बाप्पाच्या नावापुढे `मोरया` का म्हटलं जातं? याचा अर्थ माहितीये?
Ganesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पा मोरयामधील या मोरयाचं नेमकं प्रयोजन काय? कायम बाप्पापुढे का म्हटलं जातं मोरया? जाणून घ्या ही 600 वर्ष जुनी कथा...
Ganesh Chaturthi 2024 : लाडक्या बाप्पाचं अर्थात गणरायाचं रुप डोळ्यांपुढे आलं की सारी संकटं दूर झाल्याची अनुभूती होते. सर्व चिंता मिटल्याचा किंवा त्यावर तोडगा निघेल असा विश्वास मनात घर करतो. अशा या गणरायाचा आपल्या घरी येऊन मुक्काम करण्याचा काळ म्हणजे गणेशोस्तव. दीड, पाच, सात आणि दहा किंवा बारा दिवसांचा मुक्काम करण्यासाठी गणपती बाप्पा दरवर्षी आपल्या भेटीला येतो. हा मुक्काम इतका खास असतो, की बाप्पाच्या स्वागतासाठी शक्य त्या सर्व परिंनी तयारी केली जाते. बाप्पाला आळवत गणपती बाप्पा मोरयाssss अशी आरोळी ठोकली जाते.
गणपती बाप्पाssss असं कोणी म्हटलं की सराईताप्रमाणं अनेकांच्याच तोंडून मोरयाssss चा जयघोष होतो. पण, ही सवय नेमकी लागली कशी? हे मोरया गणपती बाप्पाच्या नावासोबत नेहमी का जोडलं जातं? ठाऊक आहे का? यासाठी 600 वर्ष मागे जावं लागेल.
कथा आहे अतिशय रंजक...
महाराष्ट्रातील चिंचवड गावातील ही कथा आहे असं म्हटलं जातं. तिथं 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे गणपतीचे परमभक्त होते. दर गणेश चतुर्थीला ते चिंचवडहून 95 किमी अंतरावर असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनासाठी येत असत. असं म्हणतात की मोरया गोसावी वयाच्या 117 व्या वर्षापर्यंत या मंदिरात जात असत. पण, वय वाढत असताना त्यांना या मंदिरात जाणं शक्य होत नव्हतं. यामुळं ते कायम हताश राहत. अनेक कथांनुसार त्यानंतर खुद्द गणरायानंच मोरया गोसावी यांच्या स्वप्नात येत त्यांना दर्शन देऊन तुला दर्शन देऊन असं सांगितलं.
हेसुद्धा वाचा : मुंबईतील विनायकाची मंदिरे
दुसऱ्याच दिवशी सकाळी मोरया गोसावी चिंचवड येथील कुंडामध्ये स्थान करण्यासाठी पोहोचले. तिथं डुंबून बाहेर येताना त्यांच्या हाती गणपतीची एक लहान मूर्ती होती. याचा थेट संबंध त्या स्वप्नाशी जोडत त्यांना बाप्पानं दर्शन दिल्याचं म्हटलं गेलं. यानंतर मोरया गोसावी यांनी ही मूर्ती मंदिरात स्थापित केली आणि इथंच त्यांचीही समाधी बांधण्यात आली.
गणपतीचं हे मंदिर आज मोरया गोसावी या नावानं ओळखलं जातं आणि तेव्हापासून आतापर्यंत गणपतीच्या नावासोबत इथं कायमच मोरया हे नावही जोडलं गेलं. असं म्हणतात की पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया असं म्हणण्यास सुरुवात झाली आणि हा जयघोष अखंड निनादत राहिला... आहे ना ही कथा कमाल?