वडिलांना पुन्हा भेटणार का? गौतमी पाटील म्हणते, मी एकट्याने...
Gautami Patil : गौतमी पाटील तिच्या डान्समुळे कायम वादात अडकल्याचं पाहायला मिळते. गौतमीच्या डान्सवरून वाद झाल्यानंतर तिच्या आडनावावरून वाद पेटला होता. अशातच गौतमीच्या वडिलांनी माध्यमांसमोर येत गौतमीला भेटण्याची इच्छा व्यक्त करत तिला पाठिंबा दिला आहे.
Gautami Patil : लावणी डान्सर गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) तिच्या नृत्यासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. एकीकडे तिच्या अदाकारिने सगळ्यांना वेड लावलं आहे तर दुसरीकडे याच नृत्यामुळे तिच्यावर सडकून टीका केली जातेय. राज्यातील राजकारणातही गौतमीच्या नावाची चर्चा सुरु झालीय. अशातच आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. नुकतेच गौतमीच्या वडिलांनी (Gautami Patil Father Ravindra Patil) समोर येऊन या सर्व प्रकारावर भाष्य केले आहे. यासोबत गौतमीला भेटण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे. मात्र याबाबत गौतमीने वडिलांच्या इच्छेवर कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.
गौतमीचे वडील रवींद्र पाटील हे गेल्या कित्येक वर्षांपासून मुलगी आणि पत्नीपासून वेगळे राहत आहेत. कौटुंबिक वादामुळे गेली अनेक वर्षे त्यांची भेट झालेली नाही. गौतमी वादात सापडलेली असताना रवींद्र पाटील यांनी माध्यमांसमोर येत तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकदा तरी गौतमीने भेटण्यासाठी यावं आपल्याला पुन्हा पप्पा म्हणून हाक मारावी, अशी अपेक्षाही रवींद्र पाटील यांची आहे. मात्र गौतमीने यावर स्पष्टपणे भाष्य केलेलं नाही. हा घरगुती प्रश्न असल्याचे गौतमीचे म्हणणं आहे.
"मी इथपर्यंत कशी आले याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. हा घरगुती प्रश्न असल्याने यामध्ये मी काही बोलू शकत नाही. मी एकट्याने निर्णय घेणारी मुलगी नाही. माझ्या मागे आई आहे अजून. मी यावर नाही बोलू शकत. घरगुती वाद असल्याने तो इथे आणू शकत नाही," असे गौतमी पाटीलने स्पष्ट केले.
काय म्हणाले गौतमीचे वडील?
"गौतमीची खूप आठवण येते. ती व तिच्या आईने पुन्हा आपल्या सोबत राहावं. आपण गौतमीच्या कायम पाठीशी आहोत. एकदा तरी गौतमीने भेटण्यासाठी यावं आपल्याला पुन्हा पप्पा म्हणून हाक मारावी," असे गौतमीचे वडील रवींद्र पाटील म्हणाले. यासोबत गौतमीच्या आडनावावरुनही त्यांनी भाष्य केले आहे. तिचं आडनाव पाटीलच आहे, तर ते पाटील आडनाव कसं काढणार? गौतमीप्रमाणेच अनेक कलाकार त्यांची कला सादर करतात आणि त्यांनी त्यांचं आडनाव काढावं म्हणून कोणी का बोलत नाही? असा सवाल रवींद्र पाटील यांनी केलाय.
घनश्याम दराडेला दिलं प्रत्युत्तर
छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दराडेने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गौतमी पाटीलला इशारे दिले आहेत. सोलापुरात गौतमीताई पाटलांचा कार्यक्रम चालू असताना खाली तरुण मार खात होते. यामध्ये तुम्हीही मार खाऊ शकता. तेव्हा त्याला महाराष्ट्र जबाबदार नसणार, तुमचे कारनामे जबाबदार असणार असे घनश्याम दराडेने म्हटलं होतं. त्यावर गौतमीने प्रतिक्रिया देत काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही या आपण बोलू, अशी प्रतक्रिया दिलीय.