Ghodbunder Road: घोडबंदर रोड येथे नेहमीच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. कधी कधी तब्बल अर्धा-एक तास वाहतुक कोंडीत अडकून पडावे लागते. घोडबंदर येथील वाहतुक कोंडीवर उपाय म्हणून घोडबंदर रोडची रुंदी वाढवण्यात येणार आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या संदर्भात त्यांनी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात नेहमी होणाऱ्या वाहतुक कोंडीवर सरनाईक यांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी घोडबंदर वाहतुक कोंडीच्या प्रश्नावरही उत्तरे दिली आहेत. गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन दरम्यानचा घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करून सध्याच्या चौपदरी रुंदीवरून सुमारे ८-१० लेन बसवल्या जातील आणि येथील वाहतूक जलद गतीने सुरू होईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.


मध्यंतरी गायमुख घाटाचे काम सुरु होते तेव्हा वाहन चालकांना एक- दोन तास वाहतुक कोंडीत अडकून पडावे लागत होते. आता जो प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावामध्ये गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंत हा एका बाजूला सीआरझेड आणि खाडी किनारा आणि संजय गांधी नॅशनल पार्क ही वनखात्याची जागा असल्याने दुसऱ्या बाजूने त्याचे रुंदीकरण करण्यात यावा. जेणेकरुन तोही रस्ता 60 मीटरचा फाउंटन हॉटेलपर्यंत होईल आणि वाहतुकीची समस्या दूर होईल. त्याच्या मधोमध गायमुख ते दहिसर चेकनाक्यापर्यंत मेट्रोचे खांब उभारावे, त्यामुळं मेट्रोदेखील पुढे जाईल. कापुरबावडी ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा 60 मीटरचा रस्ता प्रस्तावीत आहे, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. 


घोडबंदर रोडच्या दोन्ही बाजुच्या सर्व्हिस लेन मुख्य कॅरेजवेमध्ये समाविष्ट करण्याच्या माझ्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी आधीच मान्यता दिली आहे. त्यानुसार MMRDA अंमलबजावणीदेखील करत आहे. संपूर्ण रस्ता रुंदीकरण केल्यावरच या मार्गावरुन वाहतुक कोंडी नियंत्रणात येऊ शकते. गायमुख आणि फाउंटन हॉटेल जंक्शन दरम्यानचा 4.4 किमी लांबीचा रस्ता 60 मीटरपर्यंत रुंद करण्याचा नवा प्रस्ताव आता पाठवण्यात आला आहे, असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे. 


मुंबईच्या पलीकडे गुजरात, पश्चिम मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि JNPT यासह इतर ठिकाणी जाण्यासाठी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणारा घोडबंदर रस्ता हा महत्त्वाचा आहे. सध्या, राज्य महामार्ग कापूरबावडी आणि गायमुख दरम्यान सहा लेनसह 42 मीटर रुंद आहे आणि दोन्ही बाजूंना 2x2 सर्व्हिस लेनसह एकत्रितपणे 18 मीटर रुंद आहे. मात्र, गायमुख आणि फाउंटन हॉटेल दरम्यान चार लेनसह महामार्ग अवघ्या 18 मीटरपर्यंत अरुंद झाला आहे. ज्यामुळे दोन्ही टोकांना अडथळे निर्माण होतात आणि केवळ मार्गावरच नव्हे तर ठाणे शहर आणि अहमदाबाद महामार्गावरही वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होतो. 


ठाणे हद्दीतील रस्त्याची बाजू सीआरझेड अंतर्गत येते त्यामुळे तेथे निर्बंध आहेत. आम्ही दुसऱ्या बाजूला नवीन लेन जोडण्यावर काम करत आहोत ज्यामुळे वाहतुक कोंडी कमी होईल, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.