संतापजनक! अभ्यासाच्या बहाण्याने शिक्षक तिला थांबवायचा, आणि नको ते चाळे करायचा
विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा खासगी क्लासेसचा लंपट शिक्षक अखेर अटकेत
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : खाजगी क्लासेसच्या शिक्षकाने क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथच्या स्वानंद शॉपिंग सेंटरमध्ये राहुल यादव याचं एज्युकेट्स अकॅडमी नावाचे कोचिंग क्लासेस आहेत. या क्लासेसमध्ये पीडित विद्यार्थिनी 2020 सालापासून शिक्षण घेत होती.
अभ्यासात जास्त मार्क कसे मिळवायचे, याचं मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली राहुल यादव या विद्यार्थिनीला उशारीपर्यंत क्लासमध्ये थांबवून ठेवायचा. क्लासमध्ये एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी शिक्षक तिला अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्याशी गैरवर्तन करायचा असा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे.
इतकंच नाही तर सीसीटीव्हीत आपलं चित्रीकरण झालं असून त्याचा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकीही द्यायाचा असा आरोपही पीडित मुलीने केला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आयपीसी 354, 354 अ, यासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात राहुल यादव याला अटक करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.