कैलास पुरी, पिंपरी : कधी एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचं सांगून... कधी लॉटरी लागल्याचं आमीष दाखवून... तर कधी भेटवस्तू मिळाल्याच्या भूलथापा देऊन आर्थिक फसवणुकीच्या घटना घडतात... त्यात आता पिंपरीतल्या एका २९ वर्षीय तरुणीची भर पडलीय. फसवणुकीचा नवा प्रकार पुढे आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयटी अभियंता तरुणीला तब्बल २६ लाखांचा गंडा घातला गेला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणी फसवणुकीच्या जाळ्यात अडकली. 
ऑस्ट्रेलियावरून गिफ्ट आल्याची बतावणी करुन पिंपरीतल्या तरुणीकडून तब्बल २६ लाख रुपये उकळले.


हिंजवडीत एका नामांकित आयटी कंपनीत कामाला असलेल्या तरुणीला गिफ्ट चांगलंच महागात पडलं. ऑस्ट्रेलियावरून महागडी भेटवस्तू आलीय, असा कॉल या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीच्या मोबाईलवर आला. त्यानंतर 44 क्रमांकानं सुरू होणाऱ्या नंबरवरून तिला व्हॉट्सअॅप मेसेजही आले. भेटवस्तू कस्टममध्ये अडकल्याची बतावणी करत तिच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. आकर्षक भेटवस्तू मिळणार म्हणून हुरळून गेलेल्या तरुणीनं चक्क कर्ज काढून सांगितलेल्या बँक खात्यात पैसे भरले. सासऱ्यांकडून ३ लाख रुपये घेतले. शिवाय मुंबईतल्या नातेवाईक महिलेकडूनही पैसे मागितले.


या महिला नातेवाईकाला संशय आल्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पण तोपर्यंत तरुणीनं २५ लाख ५९ हजार ५० रुपये विविध बँक खात्यांवर जमा केले होते.


फसवणूक करणारे दरवेळी नवनवे फंडे वापरतात. मात्र गिफ्टच्या नादाला लागून आहे नाही ते गमवण्याची वेळ येऊ देऊ नका, असं आवाहन पोलीस करतात. अलिकडच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये तरुणींना टार्गेट केलं जातंय. खास करून लग्नाचं आमीष दाखवून... त्यामुळं तरुणींनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.