मुकुल कुलकर्णी, प्रतिनिधी, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असतानात त्यात महाविद्यालयीन तरूणींचा सहभाग आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. प्रियकराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या तरूणींनी दुचाकी चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या विद्यार्थिनी बीएससीच्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियकराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यांनी एक वाहन चोरीचा प्लॅन आखला. ठरलेल्या प्लाननुसार त्यांनी गाडीचा शोध सुरू केला. त्यातच मुलींच्या वसतीगृहासमोर एका नव्या को-या मोपेडला चावी दिसली आणि त्यांनी संधी साधत गाडी घेऊन धूम ठोकली. मात्र गाडी विकायची कशी असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी ही गाडी एका मित्राकडे दिली.


गाडीचे हप्ते थकल्याचा बनाव त्यांनी रचला. त्याच दरम्यान नाशिकच्या गंगापूररोड पोलीस ठाण्यात वाहन चोरीची तक्रार दाखल झाली होती. क्राईम ब्रांचने शोध सुरू केला आणि जिल्हा रुग्णालयाच्या आवारात संशयास्पदरित्या गाडी आढळून आली आणि चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.


पहिल्यांदाज वाहन चोरीत तरूणी आणि त्याही महाविद्यालयात शिक्षण घेणा-या आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जातेय. तरूणीही गैरमार्गाचा अवलंब करत असल्याने पालकांची चिंता वाढवणारी घटना आहे.


या दोघी तरूणींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मात्र ही चोरीची परिसरात चर्चेचा विषय ठरलाय. तरूणींचा गुन्हेगारी क्षेत्रातील सहभाग यापुढे टोकाला जाणार का असे प्रश्न उपस्थित केले जाताहेत.