पुणे: टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, असा ठराव गुरुवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी टाटा उद्योग समूहाने PM Cares Fund मध्ये तब्बल १५०० कोटी रुपयांची देणगी दिली होती. याशिवाय, मुंबई येथील हॉटेल ताज विनामोबदला कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 देशावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी रतन टाटा हे मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. टाटा मोटर्स हा पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकात भर टाकणारा मोठा उद्योग समूह आहे. त्यामुळे रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी शिफारस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केंद्र सरकारला केली आहे.


गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूवर रतन टाटा यांनी उद्विग्न प्रतिक्रिया


रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा ठराव उपसूचनेद्वारे करण्यात आला. या उपसूचनेला एकमताने मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता सरकार पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या शिफारशीचा विचार करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पहिल्यांदाच पुढे आलेली नाही. यापूर्वी चेंज डॉट ओआरजी या संकेतस्थळाच्या माध्यमातून टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली होती. जगभरातील नेटकऱ्यांनी या याचिकेला पाठिंबा दर्शवला होता.