वडिलांना मारणाऱ्या आरोपीची मुलाने 30 वर्षांनी केली रहस्यमयरित्या हत्या; एका CCTV ने केला भांडाफोड
Gondia Crime : गोंदियात वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलाने त्याच्या साथीदारासह मिळून एकाचा खून केला आहे. आरोपींना सुरुवातीला हा खून अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचे उघड झाले.
प्रविण तांडेकर, झी मीडिया, iगोंदिया : खून का बदला खून असा डायलॉग आपण सिनेमात ऐकतो. पण 30 वर्षांपूर्वी वडिलांचा खून करणाऱ्या व्यक्तीचा रहस्यमयरित्या खून करून त्याला अपघात भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे. पुरावे आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलघडा केला आहे. या खून प्रकरणाचा छडा लावून सत्यता पडताळून गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान, हा अपघात नसून खून असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं आहे.
वडिलांचा खून केल्याचा रागातून लोखंडी रॉडने एका व्यक्तीचा खून करणार्या मुलाला त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सुनील धनिराम भोंगाडे (44) आणि शाहरूख हमीद शेख (24) अशी आरोपींची नावे आहेत. खुनानंतर आरोपींनी हा अपघात असल्याचे भासवण्याचे प्रयत्न आरोपींनी केला होता. पण मृताची स्थिती, घटनास्थळावरील भौतिक पुरावे व शेजारील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर फुलचूरटोला ते पिंडेकपार या रस्त्यावर झालेला अपघात हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले.
गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फुलचुरटोला ते पिंडकेपार जाणाऱ्या मार्गावर 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 6 : 30 वाजण्याच्या दरम्यान एक अपघात झाला होता. या अपघातात मोटारसायकलवरील मोरेश्वर खोब्रागडे यांचा मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघात संशयास्पद असल्याने खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली होती. यावरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 302, 341, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खून प्रकरणाचा छडा लावून हा अपघात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
"29 नोव्हेंबर रोजी फुलचुरटोला - पिंडकेपार मार्गावर मोरेश्वर खोब्रागडे यांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्याआधारे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मृताच्या डोक्यावर असलेली जखम आणि घटनास्थळावरुन हा प्रकार अपघाताचा नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं होतं. हा खूनाचा प्रकार असल्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याआधारे तपास केला असता हा खून असल्याचे उघड झाले त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये सुनील आणि शाहरूखचा सहभाग असल्याचे उघड झाले. सखोल चौकशी केली असता सुनीलने सांगितले की, 30 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचा मोरेश्वर खोब्रागडेने खून केला होता. त्या खूनाचा बदला घेण्यासाठी खोब्रागडेच्या डोक्यावर आणि पोटावर लोखंडी रॉडने मारहाण करुन हत्या केली. या प्रकरणाचा पुढील तापस गोंदिया ग्रामीण पोलीस करत आहेत," अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी दिली.