Mumbai News Update: विद्याविहार रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) वर शनिवारी रात्री दुसरा गर्डर लाँच केला गेला आहे. मुंबई महापालिकेच्या एन विभाग हद्दीत पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरुन जाणारा हा उड्डाणपूल आहे. या पुलासाठी 1 हजार 100 मेट्रिक टन वजनाचा सुमारे 100 मीटर लांबीचा दुसरा गर्डर यशस्वीरित्या स्थापित केला आहे. या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलामुळं घाटकोपर, कुर्ला, विद्याविहार, चेंबूरसह विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. त्याचबरोबर घाटकोपरमध्ये इंटरनल ट्रॅफिकपासून सुटका होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामकृष्ण चेंबूरकर आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानक रुळांवरून जाणारा उड्डाणपूल मुंबई महापालिकेच्या पूल विभागाच्या वतीने बांधण्यात येत आहे हा प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. 2020 मध्येच हा पूल तयार होणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणास्तव आता हा पुल 2024पर्यंत नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. 


उड्डाणपुलाच्या गर्डरबाबत बोलायचे झाल्यास भारतीय रेल्वे रुळांवरील आत्तापर्यंत सगळ्यात मोठा गर्डर आहे. याची लांबी 99.34 मीटर आणि रुंदी 9.50 मीटर इतकी आहे. याचे वजन प्रत्येकी 1100 मेट्रिक टन आहे. खांबांचा आधार न घेता हा गर्डर रेल्वे ट्रॅकच्या मधोमध बांधला जात आहे.


100 मीटर पूल


लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणाऱ्या या पुलाला एकूण दोन मार्गिका आहेत. एकूण 650 मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळावर 100 मीटर पूल, तर पूर्वेला 220 मीटर आणि पश्चिम बाजूला 330 मीटर लांबीचा रोड बांधण्यात येत आहे. रेल्वे रुळावर बांधण्यात आलेल्या पुलाची रुंदी 24.30 मीटर असेल. यामध्ये दोन्ही बाजूंच्या 2-2 मीटरच्या फूटपाथचाही समावेश आहे. तर रोडची एकूण रुंदी 17.50 मीटर असेल. यामध्ये दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक मीटरच्या फूटपाथचा समावेश असेल.


या प्रकल्पाचा एकूण खर्च 178 कोटी रुपये इतका आहे. यातील रेल्वे रुळांवरील मुख्य उड्डाणपुलासाठी 100 कोटी रुपये आणि अप्रोच रोड व अन्य कामांसाठी 78 कोटी रुपये आहे. या उड्डामपुलावरुन विद्या विहार रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मपर्यंत जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पाअंतर्गंत दोन्हीकडे तिकिट घर, स्टेशन मास्तर कार्यालय यांचे पुननिर्माण केले जात आहे. सर्व्हिस रोडअंतर्गंत पूर्वेकडिल भागात सोमैया नाल्याचेही काम करण्यात येणार आहे.