मुलगी झालीये? सरकार तुम्हाला देणार 50,000 रुपये; पाहा या योजनेची A to Z माहिती
Govenrment Scheme : सरकारी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर मिळतात 50,000 रुपये; पाहा ते मिळवण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाची अट. तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या घरात कोणाला मुलगी झालीये का?
Govenrment Scheme : जागतिक आर्थिक मंदी, चलन तुटवडा हे असे शब्द गेल्या बऱ्याच काळापासून कानांवर पडत असले तरीही देशातील विविध वर्गांमध्ये असणाऱ्या घटकांच्या विकासासाठीच्या योजना मात्र कमी होत नाहीत. भारतातही केंद्र सरकार असो किंवा विविध राज्यांमध्ये असणारं राज्य सरकार असो. प्रत्येक स्तरावर त्या त्या राज्यातील घटकांचा विकास केंद्रस्थानी ठेवत विविध योजनांची आखणी केली जाते.
माझी कन्या भाग्यश्री योजना...
केंद्राच्या साथीनं अनेक राज्य महिला आणि तरुणींच्या विकासासाठी अगणित योजनांची आखणी केली जाते. (Maharashtra) महाराष्ट्रही यात मागे नाही. शैक्षणिक आणि आर्थिक धोरणं राबवत त्याचा महिलांना कसा फायदा होईल याचाच विचार राज्यातही केला जातो. याच धर्तीवर महिलांचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक अद्वितीय योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचं नाव आहे, 'माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana)'.
प्राथमिक माहिती द्यायची झाल्यास या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर काही अटींची पूर्तता केल्यास राज्य शासनाच्या वतीनं 50 हजार रुपये दिले जातात. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 1 एप्रिल 2016 पासून ही योजना सुरु करण्यात आली. मुलींना विविध क्षेत्रांमध्ये वाव देण्याच्या हेतूनं ही योजना सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातील स्थानिकांनाच या योजनेचा लाभ घेता येतो.
काय आहेत या योजनेच्या अटी?
कोणतीही योजना म्हटलं की त्याच्या अटी आल्याच. या योजनेच्या बाबतीतही अशाच काही अटींची पूर्तता केली जाणं अपेक्षित आहे. मुलीच्या जन्मानंतर महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या माता- पित्यांनी वर्षभराच्या आत नसबंदी करत असल्यास त्यांच्या खात्याक 50 हजार रुपये शासनाच्या वतीनं जमा केले जातील.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Budget 2023 : मुलींच्या हितासाठी राज्य सरकारची 'लेक लाडकी' नवीन योजना
या योजनेअंतर्गत जर आई- वडिलांनी दुसऱ्यांना मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेतला असेल तर, दोन्ही मुलींच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी 25 हजार रुपये इतकी रक्कम जमा केली जाईल. इथं व्याजाचे पैसे मिळणार नाहीत ही लक्षात घेण्याजोगी बाब. मुलगी जेव्हा 18 वर्षांची होईल तेव्हा तिला ही संपूर्ण रक्कम मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या मुलीचं किमान शिक्षण 10 वी उत्तीर्ण इतकं असावं ही अटही इथं लक्षात घ्यावी.
योजनेसाठी कसा कराल अर्ज?
माझी कन्या भाग्याश्री योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. इथं तुम्हाला योजनेसाठीचा फॉर्म उपलब्ध होईल. हा फॉर्म भरल्यानंतर तो महिला- बाल विकास कार्यालयात जमा करावा. संपूर्ण पडताळणीनंतर सरकार तुम्हाला निर्धारित रक्कम प्रदान करेल.
योजनेसाठीची कागदपत्र...
महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) असणं बंधनकारक आहे. शिवाय आई किंवा मुलीचं बँक अकाऊंट पासबुक, एक वैध मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, निवासाचा दाखला, आयडेंटिटी प्रूफ अशा कागदपत्रांची आवश्यकता आहे.
राज्य शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर मुलींच्या शिक्षणासाठी केला जाऊ शकतो. यासाठी आई आणि मुलीच्या नावे बँकेत खातं खोलण्याची प्राथमिक गरज असून, त्यावर 1 लाखांचा दुर्घटना विमा आणि 5 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टचीही सुविधा मिळते.