सरकारी शाळांमध्ये आता नर्सरी-केजी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
आता सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांना देखील नर्सरी आणि केजी यांच्यामध्ये शिक्षण घेता येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
लहान बालकांच्या शिक्षणासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारी शाळांमध्ये मुलांना नर्सरी आणि केजीमध्ये शिक्षण घेता येणार आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षात बालवाडी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांना देखील नर्सरी आणि केजी यांच्यामध्ये शिक्षण घेता येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
शिक्षक भरतीची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार असल्याचं आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिलं आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'शाळेत चला अभियान' राबवण्यात येणार आहे.
विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल यांच्या मध्यस्थीनंतर केसरकर यांनी यासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी शिक्षण, महिला व बालविकास आणि नगरविकास मंत्रालयाची संयुक्त बैठक येणार असल्याचे जाहीर या बैठकीत निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर सदस्यांच्या प्रश्नांवर केसरकर बोलत होते. जयंत पाटील यांनी शाळा सोडलेल्या, स्थलांतरित झालेल्या आणि नियमित शाळेत न येणाऱ्या मुलांची संख्या शोधण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित करताना, यामुळे शाळांची संख्या कमी होईल, असा सवाल केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले, शाळांची पटसंख्या कमी होणार नाही. उलट नर्सरी आणि केजी सुरू होणार असल्याने संख्या वाढणार आहे. सर्वेक्षणानुसार राज्यात केवळ 3214 मुलांनीच शाळा सोडली आहे.
शिक्षकांची 1.25 लाख पदे रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार केवळ आश्वासनांची खैरात करत असल्याचा आरोप केला. यावर न्यायालयाने शिक्षक भरतीला स्थगिती दिल्याने विलंब होतोय. आता स्थगिती उठवण्यात आली असून, रोस्टर तपासले जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विभागाचे संकेतस्थळ बंद असल्याचे सांगितले. तेव्हा शिक्षक भरतीप्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा केसरकर यांनी केला.