राज्यपाल नियुक्त १२ जागांवर `या` नावांची चर्चा
राज्यपाल या नावांना पसंती देणार का ? हे पाहणे महत्वाचे
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त १२ जागांचा प्रस्ताव आणण्याची महाविकास आघाडी सरकार तयारी करत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
राज्यपाल नियुक्त १२ नावांना उद्या मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन ती नावं मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का ? याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अंतिम क्षणी खडसेंचं नाव येणार का ? हे पाहणं औत्सूक्याचं ठरणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नाव देणार आहेत.
कोणती नावं चर्चेत ?
काँग्रेसकडून रजनी पाटील, सत्यजित तांबे, नसीम खान, मुझफर हुसेन, सचिन सावंत आणि मोहन जोशी या नावांची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून श्रीराम शेटे,गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांच्या नावाची चर्चा आहे. यात राजू शेट्टी याचं नाव यापूर्वीच अंतिम झालंय.