मेघा कुचिक, झी 24 तास, मुंबई : राज्यपालांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील सडकून टीका केली आहे. राज्यपाल हे संवैधनिक पद आहे. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने राज्यपाल महाराष्ट्र अपमान करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप करत आहेत. काहीतरी गडबड व्हावी याचा प्रयत्न राज्यपाल करतात अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.


त्या पुढे असेही म्हणाल्या की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाब दो...तुम्ही भाजप वरिष्ठ नेते आहात. राज्यपालांची भूमिका तुम्हाला पटते का हे स्पष्ट करावे. फडणवीस राज्यपालांच्या विधानाचा जाहीर निषेध कराल ही अपेक्षा आहे. राष्ट्रपती यांना विनंती करावी की भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या राज्यात परत पाठवावे.


आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान आहे. आपल्याला महाराष्ट्र अस्मिता आहे यात मिठाचा खडा टाकायचा हा प्रयत्न केला जात आहे. हा महाराष्ट्र अपमान आहे. महाराष्ट्रबद्दल मनात असलेला द्वेष त्यांच्या वागण्यातून दिसतो. भाजपाला महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे.


सातत्याने महाराष्ट्राबाबत असे बोलायचं, हे कट कारस्थान करायचे आहे. सोमवारी आपण संसदेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंची सेना दिल्लीतून चालली नाही त्यांनी मुंबईतून सेना चालवली. पण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीवरी करतात असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.