Govind Pansare murder case: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. पानसरेंच्या हत्येतील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय सुनावला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच आहेत. खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर केल्याचे हायकोर्टने म्हटले आहे. याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलाय. न्यायमूर्ती ए एस किलोर यांनी याच प्रकरणातील आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत.


मॉर्निंग वॉक दरम्यान झाडण्यात आली गोळी 


कोल्हापूरच्या सम्राट नगर भागात मॉर्निंग वॉकवरून घरी परतत असताना दोन मोटारसायकलस्वारांनी गोविंद पानसरे यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या.यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. सुरुवातील, हे प्रकरण कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिस ठाण्याने हाताळले होते. नंतर हा तपास महाराष्ट्राच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (सीआयडी) यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला.


प्रकरण एटीएसकडे वर्ग 


आरोपींचा शोध घेण्यात प्रगती नसल्याने असमाधानी असलेल्या पानसरे यांच्या कुटुंबाने हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात कोणतीही प्रगती दिसली नाही. तसेच प्रकरणातील दोन शूटर अजूनही फरार आहेत. यानंतर 3 ऑगस्ट 2022 रोजी उच्च न्यायालयाने तपास एटीएसकडे हस्तांतरित केला.


खटला जलदगतीने चालविण्याचे आदेश 


उच्च न्यायालय या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून होते. परंतु या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने असे सुरू ठेवणार नसल्याचे सांगितले. मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करून दररोज सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली. असे असले तरी कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा खुलासा होईपर्यंत या प्रकरणातील तपासात कोणतेही यश आले नाही. कर्नाटक एटीएसने महाराष्ट्रात येऊन गौरी लंकेश प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे समोर आले.