नाशिकमधल्या `ग्रीन फिल्ड लॉन्स` कारवाईनंतर... उपअभियंता गायब
याच प्रकरणात शुक्रवारी उच्च न्यायालयानं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दणका दिला होता. त्यानंतर रवी पाटील गायब झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय.
नाशिक : नाशिकमधील ग्रीन फिल्ड लॉन्सवरील कारवाईच्या वादाला आता वेगळंच वळण लागलंय... ग्रीन फिल्ड लॉन्स कारवाई प्रकरणाची फाईल हाताळणारे नाशिक महापालिकेचे उप अभियंता रवी पाटील हे गायब झाले आहेत. वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाला जात असल्याचं सांगून आज सकाळी ते घराबाहेर पडले. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. या कारमध्ये त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलीय. कार्यालयीन काम करताना येत असल्यामुळं दबावामुळं आपण आत्महत्या करतोय, असं चिठ्ठीत लिहिलंय. पाटील यांचा मोबाइल फोन देखील मोटारीतच आढळून आलाय.
या प्रकारानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गंगापूर पोलिसांत तक्रार दाखल केलीय. या प्रकारानंतर महापालिकेच्या सर्व अभियंत्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी कसे तणावात काम करतात? हे यानिमित्तानं अधोरेखित होतंय.
बेकायदा लॉन्सवर झालेल्या कारवाईत रवी पाटील यांचाही सहभाग होता. याच प्रकरणात शुक्रवारी उच्च न्यायालयानं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दणका दिला होता. त्यानंतर रवी पाटील गायब झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय.