गुणरत्न सदावर्ते यांचा राष्ट्रवादीला दणका! निवडणूक जिंकत 25 वर्षांची सत्ता एका झटक्यात घालवली
एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा निकाल जाहीर झाला आहे. मागील 25 वर्षांपासून सत्तेत असणा-या एसटी कामगार संघटनेचा गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने पराभव केला आहे.
Gunratna Sadavarte : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीला जबरदस्त झटका दिला आहे. सदावर्ते यांनी एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत (State Transport Co Operative Bank) राष्ट्रवादीचा धुव्वा उडवला आहे. को ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक जिंकत सदावर्ते यांनी राष्ट्रवादीची 25 वर्षांची सत्ता एका झटक्यात घालवली आहे. सदावर्ते यांचा विजय राष्ट्रवादीसाठी पुढे जाऊन मोठी डोकेदुखी ठरु शकतो.
एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा निकाल जाहीर
साताऱ्यातील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा निकाल जाहीर झाला आहे. मागील 25 वर्षांपासून सत्तेत असणा-या एसटी कामगार संघटनेचा गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने 19-0 ने पराभव केला. या वेळी कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसे यांचे पोस्टर घेऊन जल्लोष साजरा केला.
150 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांनी आपल्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलचे उमेद्वार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. 23 जूनला राज्यभरातील 281 मतदान केंद्रावर ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुक पार पडली. या निवडणुकीत सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात पॅनलचे 150 उमेदवार निवडणुक लढवत होते.
सदावर्ते,पडळकर संघटनेत रस्सीखेच
मुंबईतील स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव बँक संचालक मंडळ निवडणुकी सदावर्ते यांच्यासह गोपीचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघर्ष संघटनेने देखील ही निवडणुक लढवली. सदावर्ते,पडळकर संघटनेत रस्सीखेच सुरू होती. या निवडणुकीत खरी चुरस गुणरत्न सदावर्ते पॅनल आणि शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये होती. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत सदावर्ते यांनी राष्ट्रवादीला झटका दिला आहे.
सदावर्ते यांनी नथुराम गोडसेचा फोटो त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाजूला लावला
एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते आपल्या वादग्रस्त विधानं आणि कृतींसाठी प्रसिद्ध आहेत. आता तर सदावर्तेंनी चक्क नथुराम गोडसेच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. महात्मा गांधीजींचा खुनी, नथुराम गोडसेचा फोटो त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाजूला लावला होता. नथुरामच्या फोटोला हार घालून त्यांनी अखंड भारताचा विजय असो अशी घोषणाबाजीही केली. ही स्टंटबाजी झाल्यानंतर सदावर्तेंनी नथुराम गोडसेचा फोटो लावण्याचं समर्थन केले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी सदावर्तेंना ठणकावलं
देशात नथुराम गोडसेचा नव्हे, गांधीजींचाच विचार चालेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलंय. एसटी कामगारांच्या कार्यक्रमात गुणरत्न सदावर्तेंनी गोडसेच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला, गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.. त्यावर फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.