निलेश खरमरे, झी मीडिया, भोर : बातमी आहे महिलांनी हातानी बनविलेल्या गोधड्यांची... पुणे जिल्यातील टिटेघर गावातील महिलांनी एकत्र येऊन तयार केलेल्या गोधड्यांची उब सातासमुद्रापार गेलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरासमोरच्या अंगणात बसून गाणी गात या महिला गोधड्या शिवण्यात दंग झाल्यात. गप्पा आणि गाणी म्हणत या महिला एकमेकांना गोधड्या शिवायला मदत करतायत. ही दृष्यं आहेत भोर तालुक्यातील टिटेघरमधील. मार्च एप्रिल महिन्यात शेतीतील कामे कमी असल्याने महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन गोधड्या शिवण्याचा व्यवसाय सुरु केलाय. या गोधड्या हातानीच शिवल्या जात असल्यामुळे या गोधड्या टिकाऊ आणि ऊबदार असतात. विशेष म्हणजे या गोधड्यांची किर्ती सातासमुद्रापार पोहचलीय. 


गोधडीचा व्यवसाय करण्यासाठी या महिलांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज होती. ती त्यांना ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपलब्ध झाली. तर भोरचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार वर्षा शिंगन-पाटील यांनी गावातील महिलांचं समुपदेशन तसंच प्रशिक्षणाची व्यवस्थाही केली. 


अमेरिकेतील भारतीय नागरिक आरती अनावकर यांच्या मार्फत परदेशात टिटेघरच्या गोधड्यांचं मार्केटिंग करण्यात आलंय. आगामी काळात गोधड्यांसह महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या आणि इतर वस्तूंची विक्रीही मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. या गोधड्यांच्या माध्यातून ग्रामीण भारताचा डंका जगभरात वाजणार हेही खरं...