कोकणच्या हापूस आंब्यावर आखाती देशांनी लादले कठोर निर्बंध
आखाती देशांत आंबा निर्यात करताना शेतकऱ्यांनी सतर्क रहाणे गरजे आहे.
प्रणव पोळेकर, रत्नागिरी : कोकणच्या हापूस आंब्याच्या निर्यातीवर आखाती देशांनी कठोर निर्बंध लादले आहेत. आंब्यावर फवारणी करण्यात येणाऱ्या किटकनाशकांच्या प्रमाणाबाबत हे निर्बंध आहेत. यामुळे आखाती देशांत आंबा निर्यात करताना शेतकऱ्यांनी सतर्क रहाणे गरजे आहे. जगप्रसिद्ध कोकणच्या हापूसला आता जी.आय. मानांकन मिळाल्याने हापूसची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र, या हापूसच्या निर्यातीमध्ये गेल्या काही वर्षात अनेक अडथळे आले आहेत. हापूसच्या निर्यातीवर युरोपीय देशांनी घातलेली बंदी उठते न उठते तोच आता आखाती देशांनी हापूसवर कठोर निर्बंध लादले आहेत.
आंब्यावर फवारणी करण्यात येणाऱ्या किटकनाशकांच्या प्रमाणाबाबत हे निर्बंध आहेत. फवारणीनंतर या कीटकनाशकांचा प्रभाव फळांमध्ये राहत असल्याने आणि तो शरीरासाठी अपायकारक असल्याने हे निर्बंध लादत असल्याचे आखाती देशांनी सांगितले आहे. २०१७ मध्ये या देशांनी काही गाईडलाईन्स दिल्या होत्या की आता कोणत्या प्रकारचा आंबा आयात करतील, त्याची अंमलबजावणी त्यांनी यावर्षीपासून सुरू केलेली आहे, पण ही बंदी नसल्याचे पणन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कोकणातील सर्वाधिक हापूस हा आखाती देशात निर्यात होतो. मात्र, यापुढे किटकनाशकांचा प्रभाव आंब्यावर आढळल्यास माल परत येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आखाती प्रदेशात ३० टक्के, युरोपमध्ये १० टक्के, अमेरिकेत ४० टक्के आंबा निर्यात होतो. सर्वच देशांनी आंब्यावर काही निर्बंध घातलेले आहेत. पण आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हे नियम काही नवीन नाहीत असे वाटते. कीटकनाशकांचे अंश आंब्यात मिळू नयेत एवढी आखाती देशांची अपेक्षा आहे. त्यामुळे फवारणी करताना सर्वच शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.