`हॅशटॅग` सूट आणि १०५ वर्षांच्या आजीबाई
पुणेकर आणि त्यांचा उत्साह... जेवढे किस्से सांगावे तितके कमीच...
पुणे : पुणेकर आणि त्यांचा उत्साह... जेवढे किस्से सांगावे तितके कमीच...
असाच एक किस्सा नुकताच पुण्यात घडलाय. यामुळे 'हॅशटॅग'ला कुठून सुचलं आणि प्रजासत्ताक दिनाची ऑफर जाहीर केली? असा प्रश्न पडून डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.
काय होती ऑफर?
त्याचं झालं असं की, 'हॅशटॅग' मेन्स वेअरनं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ज्येष्ठ नागरिकांसाठी एक झक्कास ऑफर जाहीर केली होती... ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या खरेदीदाराना त्याचं जेवढं वय आहे तेवढी सूट खरेदीवर मिळणार, अशी ही ऑफर होती.
खरेदीसाठी आल्या १०५ वर्षांच्या आजी
'हॅशटॅग'चा हा उत्साह पुण्यातल्या १०५ वर्षांच्या आजींच्या उत्साहासमोर मात्र फिका ठरला. 'हॅशटॅग'च्या निवेदिता नहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लक्ष्मी रोडवरच्या शाखेतून त्यांना फोन आला की १०५ वर्षांच्या आजी खरेदीसाठी आल्या आहेत, तेव्हा ही ऑफर आपल्या अंगाशी येतेय की काय? असंच त्यांना वाटलं.
शब्द पाळण्याचा सुखद धक्का...
यावर, आपला शब्द पाळत दुकानानं आजीबाईंना गारमेंट खरेदीवर १०० टक्के सूट तर दिलीच शिवाय आणखी ५ टक्के रक्कम आजीबाईंना देऊ केली.
त्यावर आजीबाईंनी नम्रतेनं त्यांनी देऊ केलेली ५ टक्के रक्कम नाकारून 'हॅशटॅग'लाच धक्का दिला. आपल्यासाठी हा वेगळाच पण सुखद अनुभव असल्याचं नहार यांनी म्हटलंय.