प्रशांत परदेशी, झी २४ तास, नंदुरबार : सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धूम सुरू आहे. त्यात काही ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी खटपटी होतायत. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळीच्या ग्रामपंचायतीनं चक्क सरपंचपदाची बोली लावल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांनी 42 लाखांमध्ये ही बोली जिंकल्याचं बोललं जातंय.  नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी गावातील 13 सदस्यांची ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे ते आनंदोत्सव करतायत खरा, मात्र ही प्रक्रिया संपूर्णतः लोकशाही पद्धतीनं झाली नसल्याची चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरपंचपदासाठी बोली लावण्यात आल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नातलगाची सरपंचपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 


अर्थात, यावर राष्ट्रवादीचे नेते स्पष्ट बोलण्यास तयार नाहीत. प्रदीप पाटील नॉट रिचेबल आहेत, तर बोली लावल्याची बातमी अफवा असल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे सांगतायत. 



मोरे असं म्हणत असले तरी त्यांनीही प्रदीप पाटील यांचं जल्लोषात अभिनंदन केलंय. शिवाय ७२ वर्षांत प्रथमच खोंडामळीची ग्रामपंचायत बिनविरोध कशी काय आली, अशी शंकाही घेतली जातेय. 


ही बातमी किती खरी किती खोटी याची निवडणूक आयोगानं शहानिशा करावी. बोलीच्या पैशांमधून ग्रामदैवत असलेल्या देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे म्हणे... मात्र त्यासाठी लोकशाहीचा लिलाव करण्याची आवश्यकता होती का?