सोलापूर : सोलापुरातील बुधवार पेठ येथे शरीफाबी पल्ला यांच्या नावे सुमारे 2 हजार स्केअर फूट मिळकत आहे. चार खोल्यांचे घर आणि दुकान याचाही या मिळकतीत समावेश आहे. शौकत आणि नजीर अहमद पल्ला यांच्या त्या नात्याने काकू.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काकू शरीफाबी पल्ला यांचा 12 मे 2008 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मिळकतीवरून शौकत पल्ला आणि नजीर पल्ला या दोघा भावांमध्ये वाद सुरु झाले. बुधवार पेठ ते सोलापूर एसटी स्टॅण्ड येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या या मिळकतीचे बाजारभावाप्रमाणे मूल्य हे जवळपास 1 कोटी रुपये इतके आहे.


नजीर अहमद पल्ला यांनी ही मिळकत बळकवण्याचा डाव आखला. मृत शरीफाबी यांना अपत्य नव्हते. त्यामुळे नजीर याने बनावट वारस प्रमाणपत्र तयार केले. ते प्रमाणपत्र त्याने नगर भूमापन कार्यालयाकडे सादर केले. त्याआधारे त्याने ती मिळकतीची जागा स्वत:च्या नावावर करुन घेतली.


विशेष म्हणजे त्या घरात भाड्याने राहणाऱ्या भाडेकरुला नजीर पल्ला याने अवघ्या 13 लाख रुपये इतक्या कवडीमोल भावात ही जागा विकली. याची कुणकुण त्यांचे बंधू शौकत पल्ला यांना लागताच त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.


शौकत पल्ला यांनी नगर भूमापन कार्यालयातही तशी तक्रार दाखल केली. त्यांनतर तपासाची चक्रे फिरली. पुन्हा कादगपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात नजीर पल्ला याने चक्क न्यायाधिशांची बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचे समोर आले.


या प्रकाराची गंभीर दखल घेत सरकारी पक्षातर्फे नगर भूमापन कार्यालयातील परिक्षण भूमापक समीर खाटीक यांनी सदर बझार येथे फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीनुसार नजीर अहमद पल्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पोपटराव धायगुडे यांनी दिली.