कोरगाव-भीमाला छावणीचं रुप, ५ हजार पोलीस तैनात
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल ५ हजार पोलीस कर्मचारी तैनात
मुंबई : गेल्यावर्षी 1 जानेवारीला शौर्यदिनी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा पुणे जिल्ह्यातील कोरगाव-भीमाला छावणीचं रुप देण्यात आलंय. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल ५ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या १२ तुकड्या, १२०० होमगार्ड, २००० स्वयंसेवक आणि ५२० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आज शौर्यदिनानिमित्त करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. भीम आर्मीच्या 15 कार्यकर्त्यांना काल शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना मालाडच्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. त्यामुळे राज्यभरात तणावपूर्व शांतता पाहायला मिळत आहे.
यंत्रणा सज्ज
विजय दिनाच्या निमित्तानं कोरेगाव-भीमामध्ये १० लाख लोक येतील असा अंदाज बांधून तयारी केल्याचं नवलकिशोर राम यांनी सांगितलं. नियंत्रण कक्ष, महिती केंद्र, अग्निशमन यंत्रणा, बसेस, अँब्युलन्स तैनात राहणार आहेत. याशिवाय चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेराचा वापर होणार आहे. मोबाईल शौचालयं आणि पाण्याच्या टँकरचीही सोय कोरेगाव-भीमामध्ये करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिलीय.