अतिपावसाने कापूस काळवंडला; शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान
बागायती कापूस काळवंडला
जळगाव : राज्यात सर्वाधिक प्रमाणात बागायती कापसाचे उत्पादन घेणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. अतिपावसामुळे बागायती कापूस काळवंडला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान झालं आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साडेपाच ते सहा लाख हेक्टरवर बागायती कापसाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्याने कापसाचे पीक जोमानं आलं होतं. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस तसंच ढगाळ वातावरणामुळे कापसाचे शेकडो हेक्टरवरील पीक खराब झालं आहे. शासनाने बाधित शेतांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातं आहे.
मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतीवर बसला असून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातकापणीचे दिवस तोंडावर असताना गेली चार ते पाच दिवस पडलेल्या परतीच्या पावसाचा जोरदार फटका भातशेतीवर बसला आहे.
पावसामुळे बहुतेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने भाते पिके कुजली. तर काही ठिकाणी कापून ठेवलेली भातपिकं खराब झाली आहेत. तर कापलेल्या भातपिकांच्या लोंब्याना मोड आल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे. सिंधुदुर्गात अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. पावसाने शेतीच मोठे नुकसान झाले आहे.