अतिवृष्टी: गडचिरोली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी जनजीवन विस्कळीत
दक्षिण गडचिरोलीत भामरागड अंडी मुलचेरा या भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने सर्व प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.
गडचिरोली: अतिवृष्टीमुळे गडचिरोलमध्ये सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात १०४२ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. हा पाऊस सरासरीच्या १०६ % एवढा आहे. सध्या दक्षिण गडचिरोलीत भामरागड अंडी मुलचेरा या भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने सर्व प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.
दक्षिण गडचिरोलीचा मुख्यालयाशी संपर्क तुटला
दरम्यान, मागील ४८ तास गडचिरोलीत कोसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने दक्षिण गडचिरोलीचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. दक्षिण गडचिरोलीतील दीना-प्राणहिता-वैनगंगा नद्या कोपल्या असून या नद्यांना जोडणारे छोटे नदी-नाले पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहे. परिणामी मुख्य राज्य मार्गांसह कित्येक महत्वाचे मार्ग बंद झाले आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत
छत्तीसगडसह उडीसा राज्यात देखील तुफान पाऊस
दक्षिणेच्या टोकावर असलेल्या गोदावरी नदीत होणारा इतर नद्यांच्या पाण्याचा समावेश मंदावला आहे. छत्तीसगडसह उडीसा राज्यात देखील तुफान पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीने विक्राळ रूप धारण केले आहे.