मुंबई / पालघर : राज्याच्या पूर्व किनाऱ्याला जोरदार तडाखा देत निसर्ग वादळ पुण्याच्या दिशेने उत्तर महाराष्ट्राकडे सरकले आहे.  बुधवारी चक्रीवादळ अलिबागजवळ किनाऱ्यावर धडकले. यात घरांचे मोठे नुकसान झाले. आता रायगड जिल्ह्यात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, पालघर मध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. तर नवी मुंबईतही सकाळी आकाशात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसाला चांगली सुरुवात  झाली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघर जिल्ह्यांनाही वादळाचा फटका बसला. कालच्या चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली  तर विजेचे खांब आणि होर्डिंग कोसळले. दरम्यान, कोकण आणि अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. अलिबागजवळ विजेचा खांब पडून एक जण ठार झाला. मुंबईत पत्र्याचे शेड अंगावर पडून तीन जण जखमी झाले. वादळाने मुंबईसह रायगड, ठाणे येथे मोठे नुकसान झाले. अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळ दुपारी १२.३० वाजता मुंबईपासून ९५ किमी अंतरावर अलिबागच्या किनाऱ्यावर धडकले. वादळाचा सर्वात मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला.  


वादळाने दिशा बदलल्याने मुंबईला धोका पोहोचला नाहीे. मुंबईत जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांनाही वादळाचा फटका बसला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाऱ्यांचा वेग कमी झाला. गुजरातच्या किनाऱ्याला फारसे नुकसान झाले नाही. वादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले असून ते उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.