नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील अनेक भागात महामार्गावर पाणी साचले आहे. त्यामुळे नाशिक घोटी दरम्यानची वाहतूक विल्लोळी वाडीवरे गावाजवळ पूर्णतः बंद झाली होती. तर कसारा घाटात ही एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने त्या ठिकाणी कोंडी निर्माण झाली आहे. तर अनेक भागात पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक - त्रंबक रस्ताही पूर्णपणे पाण्यात गेला आहे. तर इतकच नाही शहरातही ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावत संध्याकाळपर्यंत नाशिकमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिकच्या अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे येथील दुतोंड्या मारुती मंदिर पाण्याखाली अर्धे गेले आहे. तर बुधवारचा आठवडी बाजारही वाहून गेला आहे. 


दरम्यान, पुराचे पाणी घराघरात शिरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच गोदावरी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच शेतमळे जलमय झालीत. शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे. येवला शहर, सिन्नर तालुका आणि चांदवडलाही पावसाने जोरदार हजेरी लावली.