कोकणात पावसाचा धुमशान! कुठे दरडी कोसळण्याच्या घटना तर कुठे पूरपरिस्थिती
मुसळधार पावसाने कोकणातलं जनजीवन विस्कळीत, नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले
Konkan Rain : कोकणाला सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे नदीला पूर आल्याने तळवडे बाजारपेठेत पाणी शिरलं. बाजारपेठेतील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं.अनेक दुकानात पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक भागातील रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. सखल भागाला तर नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून सिंधुदुर्गवासीयांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
पोलादपुरमधील चोळई गावाला दरडीचा धोका
तुफानी पावसामुळे पोलादपुर तालुक्यातील चोळई गावाला दरडीचा धोका निर्माण झाला आहे. गावालगतच्या डोंगरातुन दरडी कोसळण्यास सुरुवात झाली असुन सुरक्षिततेचा उपाय म्हणुन संपुर्ण चोळई गाव सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. दरड कोसळण्याच्या घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला देखील धोका निर्माण झाला आहे. पोलिस, महसुल आणि नरवीर रेस्क्यु टिम घटना स्थळी दाखल झाली आहे.
लांज्यात लोकवस्तीत पाणी घुसलं
मुंबई गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी बस स्टॉप जवळील लोकवस्तीमध्ये पाणी घुसलं आहे. यामुळे नागरिकाची तारांबळ उडाली आहे .तीव्र उतरावरील रस्त्याला गटार नसल्याने हे पाणी रहिवासी वस्तीमध्ये शिरले आहे. लांजा आपत्कालीन कक्षाला सूचना मिळताच सार्वजनिक बांधकाम अधिकारी तलाठी घटनास्थळी पोचले आहेत.
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. महाडसह पोलादपूर, माणगाव, म्हसळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. संपूर्ण जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यानंतर आज पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. उत्तर रायगडात देखील अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.
चिपळूण शहर अख्ख जलमय
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 4 तासापासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे त्याचा फटका चिपळूण तालुक्याला बसलाय चिपळूण शहर अख्ख जलमय झालं आहे. चिपळूण शहरातील मुंबई -गोवा महामार्गाला तर नदीचे रूप आलंय. मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणीच नदीचे रूप आलंय.
रस्त्याच्या कडेला असलेले सर्व गटार तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावर आलं आहे. शहरातील डी बी जे कॉलेज आणि शिवाजीनगर परिसरात पाणी साचालय लागलंय काही एसटी स्टँड परिसरात देखील पाणी साचालयला सुरुवात झाली गेल्या चार तासांपासून मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्हयाला अक्षरशः झोडपून काढलंय.