ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दितील कळवा पूर्व इथल्या घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.  घटनास्थळी अग्निशमन दलाने बचावकार्य सुरु केलं आहे.  


मासुंदा तलाव भरून वाहू लागला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणा-या पावसामुळे ठाण्यातील मासुंदा तलाव भरुन वाहू लागलाय. तलावाचं पाणी शेजारच्या भाजी मार्केमध्ये शिरलं. या पाण्यासोबत तलावातील मासेही भाजीमार्केटमध्ये उतरले. हे मासे पकडण्यासाठी ठाणेकरांची झुंबड उडाली होती..  



मुंब्रा - पनवेल हायवेवर पाणी


मुंब्रा, शिळफाटा आणि पारसिक परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं मुंब्रा- पनवेल हायवेवर पाण्याचा प्रवाह आलाय. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर वाढत असल्यानं लोकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन ठाणे पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय. 


बदलापुरमध्ये उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ


बदलापुर शहराजवळून वाहणारी उल्हास नदी सध्या दुथडी भरून वाहते आहे. लोणावळा आणि कर्जत परिसरात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस झाल्याने उल्हास नदीच्या पाणी पाणीपातळीत वाढ झाली आहे. सावधगिरी म्हणून नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बदलापूर शहरात गेल्या 24 तासात 137 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बदलापूरची उल्हास नदी चौपाटी सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय. पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही नसून उल्हास नदीला जर पूर आला, तर बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होतेय.


वालधुनी नदीच्या पातळीतही वाढ


अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे.  आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इथे मोठा प्रवाह निर्माण झाला आहे. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर तर या नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळालं.