मुंबई : कोकणसह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, आज सकाळी मुंबई शहराबरोबरच उपनगरांमध्ये सकाळपासूनच जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत विजांच्या कडकडाटांसह पाऊस सुरु होता. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या ४८ तासांत मुंबईसह कोकण भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पाऊस पडण्याची शक्यताआहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आज पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यामुळे सकळभागात पाणी साचले होते. हिंतमाता परिसरात पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उपनगरात सकाळपासून पावसाला चांगला जोर दिसून आला. मात्र, रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाला जोर नसल्याचे दिसून येत आहे. अधूनमधून तुरळ सरी पडत आहेत. अनेक ठिकाणी आकाश स्वच्छ दिसून येत आहे. काही ठिकाणी चक्क ऊन पडले होते.



दरम्यान, मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्याने पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीसहीत विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोकणात १ ऑगस्ट पासून चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.



कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा येथे काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवस पावसाने दडी मारलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यातही पाऊस झाला.  जुलै महिन्याच्या अखेपर्यंत राज्याच्या विविध भागांत पाऊस कायम राहणार आहे.