मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ, या जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला तर पुरात 17 जण अडकले
Rain in Marathwada, Vidarbha : विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. बीड जिल्ह्यात केज, आंबेजोगाईत अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत.
औरंगाबाद, लातूर, बीड : Rain in Marathwada, Vidarbha : 'गुलाब' या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. मराठवाड्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. बीड जिल्ह्यात केज, आंबेजोगाईत अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत. तर मांजरा नदी पुरात 17 जण अडकले आहेत. अंजना, हिवरा नदीला पूर आला आहे. दरम्यान, विदर्भातही चांगला पाऊस झालाय. यवतमाळच्या उमरखेडमधल्या दहेगाव पुलावरून एसटी बस वाहून गेली. पुलावर पाणी असतानाही चालकाचा आततायीपणा नडला आहे. दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टीचा धोका कायम असून 'गुलाब' चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रात्रीपासून मुसळधार पाऊस
बीड जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. शिमरी पारगाव गावात पुराचे पाणी शिरले आहे. तर आंबेजोगाई तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. केज, आंबेजोगाई, माजलगाव तालुक्यात रात्रभर पाऊस कोसळत आहे. मांजरा नदी काठची 10 घरं वाहून गेली आहेत. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत बीड जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या कुंडलिका सिंदफणा बिंदुसरा मांजरा या मुख्य नद्यांना पूर आलेला आहे. या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
यवतमाळ येथे एसटी पाण्यात घातल्याने वाहून गेली.
माजलगाव आणि वडवणी या दोन तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. या पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. माजलगाव तालुक्यातील शिमरी पारगाव या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला नदीपात्रातील पाणी घुसल्यामुळे नदीचा स्वरूप आले आहे. अंबेजोगाई केज तालुक्यातही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गावात पाणी घुसल्याने अनेक नागरिकांनी रात्र जागून काढावी लागली. तर देवळा गावातील मांजरा नदीच्या काठची दहा घरं वाहून गेल्याने अनेकांचे संसास उघड्यावर आले आहेत.
औरंगाबाद जिल्यात मुसळधार, नद्यांना पूर
औरंगाबाद जिल्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पिशोर गावातील अंजना नदीला पूर आला. शेतकऱ्यांनी नदी पार करण्यासाठी दोर बांधला होता. त्या दोरखंडास पकडून शेतकऱ्यांना यावे लागत आहे. आज सकाळी दोरखंड पकडलेले असताना ही एक जण वाहून जात असताना थोडक्यात बचावला. धोकादायक प्रकार थांबण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येते आहे.
औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यतील हिवरा नदीला रात्री झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं बनोटी गावात सुद्धा पाणी शिरलं आहे. रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे, नदी दुथडी भरून वाहू लागली. पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने दाणादाण
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडवून दिली आहे. सगळीकडे पाणीच पाणी दिसून येत आहे. मांजरा नदीच्या पुरात 17 जण अडकले आहेत. घराच्या छतावर वाकडी येथील नागरिक अडकले आहे. बचाव कार्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. इतर ठिकाणीही अनेकांच्या घरात घुसले पाणी आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना दिल्या आहेत.
कळंब तालुक्यातील 17 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने महापुराची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. मदतीसाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होत आहे. महसूल प्रशासनाचे अधिकारी देखील बचावासाठी प्रयत्न करत आहे.
पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहूून
राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. पुराच्या पाण्यात हिरकणी एसटी बस वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. यवतमाळच्या उमरखेडच्या दहागाव पुलावरून एसटी बस वाहून गेली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुलावर पाणी असताना चालकाने बस नेल्याने ही दुर्घटना घडली आहे. उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन पाणी जात असतांना नागपूर डेपोची एसटी बस ड्रायव्हरने नाल्यावरुन नेली.