मुंबई : पूर्व मुंबई उपनगरांत सकाळपासून वातावरण ढगाळ होतं. संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे गेले काही दिवस उन्हाच्या झळा सोसणाऱ्या मुंबई उपनगरातील रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील आठवडाभर अशीच परिस्थिती राहणार आहे. पूर्व मुंबई उपनगरात मुलुंड, भांडूप, कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर परिसरात संध्याकाळच्या दरम्यान पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेतही गारवा निर्माण झाला होता.


नवी मुंबईत जोरदार वाऱ्यासह पाऊस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही भागात वीजही गायब असून घराबाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे.


कल्याण-डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस


कल्याण डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाने हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे कल्याण डोंबिवलीच्या सखल भागात पाणी साचले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयातही पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पाऊस रात्रीपर्यंत सुरु राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सखल भागातील नागरिकांना पोलीस यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


पुणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपले


उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरुर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यांना शुक्रवारी जोरदार पाऊसाने झोडपले. गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या सततच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून बाजरी, ऊस, मुग यांसारख्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. आज झालेल्या मुसळधार पाऊसाने ओढे नाले यांना पूर आला असून शेतातही पाणी भरलं आहे.


रायगड जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस


रायगड जिल्‍हयात शुक्रवारी संध्‍याकाळच्‍या सुमारास पावसाच्‍या जोरदार सरी कोसळल्‍या. जिल्‍हयात अलिबागसह महाड, माणगाव, श्रीवर्धन, पेण, कर्जत तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता. तर उरण, खालापूर भागात पावसाच्‍या किरकोळ सरी बरसल्‍या. या पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला असला तरी हवेत गारवा निर्माण झाला आहे . त्‍यामुळे उकाडयाने हैराण नागरीकांना दिलासा मिळाला आहे.


बुलढाणा जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी


काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वदूर हजेरी लावली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाने नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. गाव खेड्यांमध्ये जाणारे रस्ते चिखलमय झालेत तर दुसरीकडे शेतातल्या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने येणारा घास हिरावतोय की अशी चिंता बळीराजाला सतावतेय. बऱ्यापैकी आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद या पिकांनाही मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.