मुंबई : राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. अर्धे राज्य या मान्सूनने व्यापले आहे. मान्सूनचे आगमन होताच जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरी, बोरीवली, दादर भागात पाऊस झाला.  गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाचा दिलासा मिळाला आहे. ठाणे, नवी मुंबईतही चांगला पाऊस झाला. तर नाशिकच्या चांदवड तालुक्यात ढगफुटी झाली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. अंधेरी, बोरीवली, दादर भागात पाऊस जोरदार पाऊस झाला. मात्र, आता पाऊस थांबला आहे. दरम्यान, नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरूय. सकाळी देखील पावसाची रिपरिप सुरू असून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. गरमीने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात  राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.



चांदवड । ढगफुटी सारखा पाऊस


नाशिकमधल्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही इथे ढगफुटी सारखा पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली. सगळीकडून पाणीच पाणी वाहू लागलं. नदी नाले ओसंडून वाहत होते. काही ठिकाणी संपर्क तुटल्याने ट्रॅक्टरवर बसवून नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. जोरदार पाऊस झाल्यानं शेती मशागतीला वेग येणार आहे. 


अकोला । विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस


अकोला शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस पडला. आचानक आलेल्या पावसानं सगळ्यांचीच तारांबळ उडाली. या पावसामुळे उकाड्याला वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


वाशिम । वाऱ्यासह जोरदार पाऊस


वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातल्या मालेगाव, मानोरा, वाशिम तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.या पाऊसाने ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाले होते. या पावसामुळे बळीराजा सुद्धा सुखावलाय. पेरणीपूर्व मशागतीचं काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. 



जालना । मुसळधार पावसाची हजेरी


जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने मुसळधार हजेरी लावली. संध्याकाळच्या सुमाराला जालना शहरासह परीसरात मुसळधार पाऊस झाला.भोकरदन शहरासह तालुक्यातही पावसानं तब्बल तासभर हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे शहरात वाहतुक तासभर विस्कळीत झाली होती.