रायगड : गेले चार दिवस परतीच्या पावसाने रायगड जिल्‍हयाला झोडपलं आहे. या पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वा-यासह दुपारनंतर सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु राहतो. त्यामुळे कापणीयोग्य झालेली भाताची रोपं आडवी झोपत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 काही ठिकाणी शेतक-यांनी कापलेली पिकं पाण्यात कुजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा हाता तोंडाशी आलेले पीक जाणाच्या शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, शेतक-यांचं यंदा मोठं नुकसान होण्याची चिन्हं आहे. यंदा जिल्ह्यात १ लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. पाऊसमान अतिशय चांगले असल्यानं पीकही चांगलं आलं होतं. मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतक-यांच्या तोंडचं पाणी पळालंय. आता भिजलेले पीक झोडून वाळवून नुकसान टाळण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. येत्‍या दोन दिवसात पावसाची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तवण्यात आलीय. त्यामुळे  पिकांची कापणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने केलंय.


दरम्यान, आजपासून (मंगळवार, १० ऑक्टो.) पुढचे चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात पावसाची दमदार हजेरी पहायला मिळण्याची शक्यता आहे. या आधीही हवामान खात्याने असाच इशारा देताना ५ ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने येत्या ४ दिवसातच हा पाऊस महाराष्ट्रात बरसू शकतो असे म्हटले आहे.