रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, काही घरांमध्ये घुसलं पाणी
कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच भागात देखील मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय. परभणी जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.
रत्नागिरी शहरात मुसळधार पावसाचा फटका नागरिकांना बसला आहे. शहरातील भाजी मार्केट कंपाउंडमधील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसामुळे नाले तुंबले आहे. त्यामुळे पाण्याने प्रवाह बदलला. नालेसफाई न झाल्याने पाणी लोकांच्या घरात शिरल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.
रत्नागिरीच्या मिरजोळे कालिकामाता येथील रस्ता पावसामुळे खचला आहे. त्यामुळे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला आहे. कोकणात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात आज रेड अलर्ट देण्यात आला होता. हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला होती. पण मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. पण कोकणात पावसाचा जोर वाढला आहे.