अतिवृष्टीमुळे २ हजार १५५ जणांचा बळी
देशात यंदा प्रचंड पाऊस झाला आहे,
मुंबई : देशात यंदा प्रचंड पाऊस झाला आहे, अतिवृष्टी आणि पुरामुळे देशात २ हजार १५५ जणांचा बळी गेला आहे. तर यंदाच्या पावसामुळे महाराष्ट्राचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील एकून २२ जिल्ह्यांना फटका बसला आणि ४३० जणांचा बळी गेले तर ३९८ जखमी झाले. त्याचप्रमाणे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर अनेक संसारं देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत.
धुळे शहरात ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने चांगलाच धिंगाणा घातला. गेल्या 19 तारखेपासून रिमझिम तर कधी मुसळधार पावसाने हजेरी लावून दिवाळीत सणवार विरजण घातलं. सततच्या पावसामुळे बाजारपेठा ओस पडल्या आहेत. पाऊस थांबत नसल्याने ग्राहक दुकानापर्यंत येत नसल्याची ओरड व्यावसायिकांची आहे.
तेरा वर्षानंतर विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. प्रकल्पातून तब्बल १ लाख १६ हजार क्युसेक प्रती सेकंद वेगाने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने प्रकल्पात मोठ्या प्रामाणात पाणी येत आहे.