हेमंत चापुडे,झी मिडीया,पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर आंबेगाव तालुक्यात पाऊसाचा हाहाकार झाला असुन चांडोह परिसराला परतीच्या पावसासह वादळी वारा आणि गारपिटीच्या पावसाने झोडपले आहे. तर जुन्नर तालुक्यातील ओतूर रोहोकडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे उभ्या पिकांसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरूर तालुक्यातील चांडोह गावात रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटीने हाहाकार माजवला. या गावात रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील उभी पिकं पाण्याखाली गेली तर काही घरं उडाल्याने बळीराजा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे.


वादळाने या गावातील सर्वच रस्ते बंद झाले असून सर्व रस्त्यावर झाडे पडली आहेत. तर अनेक शेतकरऱ्यांची घरे उडून गेली असून गावातील 50 पेक्षा जास्त विजवाहक पोल ही पडल्याने विद्युत पुरवठा ही खंडीत झाला आहे. तर वादळाने या गावातील जनजीवन अक्षरशा विस्कळीत झाले असून शेतकरी मात्र पुरता हवालदिल झाला आहे. 



गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे आधीच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना ऐन भाऊबीजेच्याच दिवशी पुन्हा एकदा वादळी पावसाने या भागाला झोडपून काढले. मायबाप सरकारने आमच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी आर्त हाक या बळीराजाची आहे.


त्यामुळे येणाऱ्या सरकारने उभ्या जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी पुरता खचून जाण्याआधीच त्याच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तो ताथ मानेने उभा रहावा यासाठी काहीतरी आर्थिक मदत करावी हिच माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.