येत्या ४८ तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान वेधशाळेने दिलेल्या माहिती नुसार मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवर हा मुसळधार पाऊस कोसळणार आहे. या पावसामुळे आता मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीचा अंदाज घेतला आहे. पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचे इशारे दिले आहेत. मुंबईत साडे अकरापर्यंत चांगला पाऊस पडला, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
मुंबईत दोन दिवस (3 आणि 4 जुलै) मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडून नका, घरातच राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
मुंबईत ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे. भारत हवामान खात्याने (आयएमडी) जारी केलेल्या जिल्हा अंदाज आणि इशाऱ्यानुसार गुरूवारी मुंबई अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.