कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 4519 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 2059 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर अजूनही 2365 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत कोरोनामुळे 91 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे. एकाच दिवसात तब्बल 4841 रूग्ण वाढले आहेत. एकट्या मुंबईत कोरोनाचे १३५० रुग्ण वाढले आहेत. मुंबईचा वाढीचा वेग कमी होत असताना राज्यातील इतर भागात मात्र मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या चिंता आता आणखी वाढल्या आहेत.


कल्याण-डोंबिवलीमध्ये राहाणारे बहुतेक लोकं हे कामासाठी मुंबईला जातात. अनलॉक झाल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात कर्मचारी बाहेर पडू लागले आहेत. त्यात मुंबईला जाण्यासाठी बसेसला मोठा प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी लोकल सुरु झाल्या असल्या तरी आता लोकलमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणं कठीण झालं आहे. लोकलमध्ये ही मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. 


कल्याण-डोंबिवलीला लागून असलेल्या आजुबाजुच्या शहरांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ., उल्हासनगर, बदलापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता चिंता आणखी वाढल्या आहेत.