नागपूर : ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हिंगणघाटच्या पीडितेची प्रकृती स्थीर मात्र चिंताजनक आहे. उद्या तिचे पुन्हा ड्रेसिंग करणार असून तिने अद्याप पापण्या उघडलेल्या नाहीत. पीडितेचा त्रास वाढणार आहे तिचा रक्तदाब स्थिर आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करताना त्याला फाशी द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या शरीरात चौथ्या दिवशी अपेक्षित असलेले काही इन्फेक्शन दिसत आहे. ते वाढू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे डॉक्टर म्हणाले. पीडितेचा हार्ट रेट किंचित वाढला आहे. इन्फेक्शन बघता औषध मात्रा वाढविणार असून तिच्या शरीरात रक्त कमी असल्याने ते उद्या दिले जाण्याची शक्यता आहे. 



अंतर्गत यंत्रणा निकामी झाल्याने तिला भोजन देऊ शकत नाही. घशातील सूज कमी झाली तर ट्यूब टाकून पोषण दिले जाणार आहे. जळीत रुग्णात इन्फेक्शनची सर्वाधीक भीती असते. तिच्या श्वसन मार्गात अडसर आहे.  रुग्णालय पीडितेची योग्य काळजी घेत असून १२ खाटांच्या कक्षात हा एकच रुग्ण आयसीयूत ठेवला गेला आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातील वर्धामधील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी हिंगणघाट बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, या घटनेचा मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.  वर्धा या जिल्ह्यात महात्मा गांधी यांनी शांतीचा संदेश दिला आहे. अशा जिल्ह्यात महिलांवर अशी वेळ येत असेल तर खूप दु:खदायक आहे. अशा घटना रोखल्या पाहिजेत. अन्यथा महिला, मुली घराच्याबाहेर पडणार नाही. आपल्या सरकारचा नारा आहे. 'बेटी बचाव, बेटी पढाव', आज मला अभिमान मुली वाचविल्या जात आहे. मात्र, मोठ्या झाल्यानंतर त्यांच्यावर असे हल्ले आणि घटना होणार असेल तर ही चिंतेची बाब आहे. यावर कडक कारवाई करण्याची आणि कडक कायदा आणण्याची गरज आहे. अन्यथा आमच्यासारख्या महिलाही यातून सुटणार नाही, अशी गंभीर बाब खासदार राणा यांनी लोकसभा सभागृहात उपस्थित केली.