Hingoli ST bus Accident : ब्रेक फेल झाल्यामुळे मोठा अपघात घडला आहे. हिंगोली येथे झालेल्या या अपघातात  एकजण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला धडक दिली. बसच्या धडकेत बाईक 200 मीटर फरफटत गेली.  एसटीच्या नादुरुस्त बसेस या प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत.


कसा झाला अपघात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही एसटी बस हिंगोली वरून परभणीच्या दिशेने निघाली होती. एसटी बस औंढा नागनाथ शहरात पोहोचल्यानंतर बसचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाला बसवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. ही बस सुरुवातीला आयशर टेम्पोला धडकली. त्यानंतर या बसने एका बाईकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बाईक आडवी होवून बस सोबत 200 मीटर फरफटत गेली


या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.  संजय वामन जाधव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  मारोती वामन जाधव आणि संजय जाधव अशी जखमींची  नावे आहेत.


शिवशाही बसचा ब्रेक फेल होवून विचित्र अपघात


पुण्यात शिवशाही बसचा विचित्र अपघात झाला होता. ब्रेक फेल झाल्यानं बस थेट फुटपाथवरील झाडावर जाऊन आदळली होती. अपघातात सुदैवानं 25 प्रवासी थोडक्यात बचावले. मात्र, बसचं मोठं नुकसान झालंय. तर झाडही आडवं झालंय. संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात ही घटना घडली.


ब्रेक फेल झाल्याने बस  5-6 वाहनांना धडकली 


पुण्याच्या उंड्री चौकात ट्रॅव्हल्स बसचा विचित्र अपघात झाला. अचानक बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने एकापाठोपाठ तब्बल 5-6 वाहनांना धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर चार जण जखमी आहेत. कोंढवा भागातील एनआयबीएम ते कडनगर या रोडवर हा अपघात झाला होता. 


ब्रेक फेल झालेली बस दुभाजकावर चढवली


आर्वीहून वर्ध्याकडे येत असलेल्या बसचे ब्रेक फेल झाले होते. मात्र, चालकानं प्रसंगावधानाने नियंत्रण मिळवत ही बस रस्ता दुभाजकावर चढवली. खांबाला धडकून ही बस थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वर्ध्याच्या कारला चौक परिसरातली ही घटना आहे. यात कुणीही जखमी झालं नसल्यानं सर्वांनी मोकळा श्वास घेतला. 


बस अपघातात 17 प्रवासी जखमी


अकोला बस स्थानकाजवळ बुलढाणाहुन दारव्हाला जाणारी बस उड्डाण पुलाला धडकली. अचानक ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडलीय. या घटनेमुळे गाडीतील 17 प्रवाशी जखमी झाले होते.