हिंगोली : नांदेड पाठोपाठ हिंगोलीतही बोगस पोलीस भरती झाल्याचं समोर आलंय. राज्य राखीव पोलीस दलात २० पोलिसांचे गुण वाढवून भरती करण्यात आलीय. एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीच्या मदतीने बोगस उमेदवार भरती करण्यात आलेत. पोलीस चौकशीत ही बाब समोर आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. तीन अधिकारी-कर्मचारी, ३ एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीच्या ऑपरेटरसह २६ जणांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलीस निरीक्षक अशोक मैराळ यांनी ही माहिती दिलीय. २०१३, २०१४ आणि २०१७ साली ही बोगस भरती झाली होती. 


प्रत्येकी ५0 हजारांची लाच 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भरती घोटाळ्यात तत्कालीन समादेशक फुफाटे व इतरांनी किती रक्कम उमेदवारांकडून उकळली हे अजून कळाले नाही. मात्र एसएसजी सॉफ्टवेअर सांगली या कंपनीच्या ऑपरेटर्सनी प्रत्येकी ५० हजार रुपये घेऊन गुणवाढ केली होती... त्यांनी तशी कबुलीही दिली आहे. त्यामुळे आता खरा आकडा मुख्य सूत्रधारांना गजाआड केल्यावरच कळणार आहे. सखोल तपास केल्यानंतर यामध्ये अजून किती जण दोषी आहेत, याचा आकडा समोर येणार आहे. तपासाअंती आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस भरती केलेल्या उमेदवारांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याच राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक योगेश कुमार यांनी दिलीय. पण त्यांनी कॅमेरा समोर काही बोलण्यास नकार दिला.


कशी झाली ही बोगस भरती 
नांदेड इथं बोगस पोलीस भरतीचं प्रकरण गाजत असताना हिंगोलीतही राज्य राखीव दलाच्या भरतीत बोगस भरती झाल्याचं उजेडात आलंय. नांदेड पोलिसांच्या तपासात एसएसजी कंपनीच्या ऑपरेटर्सनी हिंगोलीत २० जणांची नियुक्ती केल्याची कबुली दिलीय. त्यानंतर हिंगोलीचे समादेशक योगेशकुमार व सहायक समुपदेशक तडवी यांनी चौकशी समिती नेऊन हे प्रकरण उजेडात आणलं आहे. एसएसजी कंपनीच्या लोकांना हाताशी धरून सेवानिवृत्त समादेशक जयराम लोढाजी फुफाटे, नामदेव बाबूराव ढाकणे यांनी हा गोंधळ केला होता. 


कसा उघडकीस आला हा घोटाळा?


शंभर गुणांच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना येतील एवढेच प्रश्न सोडविले होते. उर्वरित प्रश्नांच्या बरोबर उत्तरांच्या पर्यायाला गोल करून  एसएसजी कंपनीच्या लोकांनी गुण वाढवून दिले होते. मात्र या उत्तरपत्रिकेत खालच्या बाजुने दुहेरी कार्बन होता, या बाबीचा संबंधितांना विसर पडला. त्यामुळे पडताळणीत ही बाब निदर्शनास आली. त्यांनी आधी गोल केलेल्या प्रश्नांच्या खालुनही कार्बनमुळे गोल झाला. मात्र, कंपनीच्या लोकांनी तसे गोल केलेल्या प्रश्नांना असे गोल आढळले नाही. त्यामुळे हे बिंग फुटले. यात एसएसजी सॉफ्टवेअरचे शिरीष बापूसाहेब ढाकणे, स्वप्नील दिलीप साळुंके, दिनेश गजभारे यांचा हात असल्याचे समोर आले.


यामध्ये २०१३ साली  चार, २०१४ साली १0 तर २०१७ या वर्षी सहा जणांची अशा पद्धतीने निवड केली गेल्याची माहिती पुढे येतेय. याबाबत पोलीस निरीक्षक पुरभाजी माणिकराव मोरे यांच्या फिर्यादीवरून सेवानिवृत्त समादेशक जयराम लोढाजी फुफाटे, चालक नामदेव बाबूराव ढाकणे, एसएसजीचा ऑपरेटर शिरीष बापूसाहेब अवधूत, स्वप्नील दिलीप साळुंके, पोलीस कर्मचारी शेख मेहबूब शेख आगा व इतर २० उमेदवारांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


या बोगस उमेदवारांवर गुन्हा दाखल 


यामध्ये गोविंद बाबूराव ढाकणे, नीलेश बाबूराव अंभोरे, सुरेश विश्वनाथ चव्हाण, युसूफ फकीर शेख, मुनाफ फकीर शेख, संदीप केशव जुंबडे, उद्धव शिवराम धोतरे, अमोल विनोद जावळे, हरिभाऊ लक्ष्मण दुभाळकर, विश्वनाथ सदाशीव दळवे, सतीश विलासराव अंभोरे, सुभाष दशरथ रिठाड, किशन रामभाऊ  शिंदे, गोरखनाथ धोंडुजी कोकाटे, अमोल विठ्ठल मांदळे, भगवान सुखदेव भोरुडे, बाळकृष्ण नामदेव वाघमारे, महादेव रामचंद्र पोवार, विठ्ठल संतोष खरात, विकास फुलचंद डोळे यांची बोगस गुणवाढीतून भरती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांवरही गुन्हा दाखल झाला.