गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीच्या (Hingoli Crime) वसमतमधून एक धक्कादाक माहिती समोर आली आहे.  12 जणांच्या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वसमत पोलिसांनी (Wasmat Police) याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. या हत्येनंतर हिंगोलीत खळबळ उडाली आहे.  मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह वसमत पोलीस ठाण्यात आणला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी सकाळी हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वसमत शहरातील रवींद्रनाथ टागोर कॉलनीमध्ये राहणाऱ्या ओमकार हेरे असे मृत तरुणाचे नाव आहे. ओमकारला यश चाहड नावाच्या तरुणाने आणि त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. ओमकारला यश आणि त्याच्या साथीदारांनी बाईकवर बसवून टाकळगाव शिवारामध्ये नेले होते. तिथे गेल्यावर ओमकारला माझ्या बहिणीकडे का बघतो आणि तिला मेसेज का करतो, असा जाब विचारला. यानंतर यश चहाड आणि त्याचा 12 साथीदारांनी ओमकारला लोखंडी रॉड, काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ओमकार गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी त्याला वसमतमधील केंब्रिज महाविद्यालयाच्या परिसरात आणून टाकलं.


यानंतर ओमकारला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान ओमकारचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार समजल्यानंतर ओमकारच्या नातेवाईकांनी थेट रुग्णालयात धाव घेतली. संपूर्ण घटनाक्रम समजल्यानंतर ओमकारचे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी त्याचा मृतदेह थेट वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये आणला. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ओमकारच्या कुटुंबियांनी घेतल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ओमकारच्या कुटुंबियांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.


दरम्यान, वसमत शहर पोलिसांनी या प्रकरणी 12 आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. यानंतर पोलिसांनी याप्रकरणातील मुख्य तीन आरोपींना गुरुवारी पहाटे बाहेर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वसमत पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली. यश चहाड, युवराज कदम, ओमकार मोहिते या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय अन्य आरोपींच्या शोधासाठी तपास सुरु केला आहे.


मुख्यध्यापकाने मेव्हण्याची केली हत्या


आई वडिलांना मारहाण करत त्यांना घराबाहेर काढणाऱ्या मेव्हण्याची मुख्याध्यापक असलेल्या आरोपीने निर्घृणपणे हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आरोपी ईश्वर ठाकूरने लोखंडी हातोड्याने वाल्मीक साहेबराव ठाकूर याची हत्या केली.