Hingoli LokSabha Constituency : हिंगोली... बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र औंढा नागनाथ... साडे तीन शक्तिपीठांपैकी एक माहुरगडाच्या रेणुकादेवीचं मंदिर... भागवत धर्माची पताका अटकेपार नेणारे संत शिरोमणी नामदेव महाराजांचं नरशी नामदेव हे जन्मगाव हिंगोलीतलंच... निजामाची जुलमी राजवट मराठवाड्यातून हद्दपार करण्यासाठी निधड्या छातीवर गोळ्या झेलून प्राणाची आहुती देणा-या शहीद बहिर्जी शिंदेंचा हा जिल्हा. हळदीसाठी हिंगोली फेमस आहे. 1 मे 1999 रोजी परभणीचं विभाजन करून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मात्र त्यामुळं समस्या काही सुटल्या नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागासलेला जिल्हा ही ओळख हिंगोलीला पुसता आलेली नाही. दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा अभाव आहे. बेरोजगारी, स्थलांतर, दुष्काळ, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या अशा एक ना अनेक समस्या कायम आहे. हिंगोलीला स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती बँकही नाही. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतूनच कारभार पाहिला जातो. माहुरगड, औंढा नागनाथ, नरशी नामदेवच्या विकासाची आश्वासनं दिली गेली, मात्र ती पाळण्यात आली नाहीत.


हिंगोलीचं राजकीय गणित


1977 मध्ये हिंगोली हा नवा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. हिंगोलीतील तीन, नांदेडमधील दोन आणि यवतमाळमधील एका विधानसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. 2009 मध्ये शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांचा 73 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये देशात मोदी लाट असतानाही काँग्रेसचे राजीव सातव खासदार झाले. त्यांनी शिवसेनेच्या वानखेडेंना केवळ दीड हजार मतांनी हरवलं. 2019 मध्ये काँग्रेसनं माजी खासदार सुभाष वानखेडेंना उमेदवारी दिली. मात्र शिवसेनेच्या हेमंत पाटलांनी त्यांचा पावणे तीन लाख मतांनी धुव्वा उडवला. विधानसभेचा विचार केला तर सध्या भाजपाचे 3 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार आहे.


शिवसेनेत फूट पडली तेव्हा कळमनुरीचे आमदार आणि खासदार हेमंत पाटील शिवसेना शिंदे गटात गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंगोलीतून विद्यमान खासदार हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपनं त्यांच्या नावाला कडाडून विरोध केला. भाजपच्या दबावामुळं मुख्यमंत्र्यांना जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागला. हेमंत पाटलांची उमेदवारी कापून बाबुराव पाटील कोहळीकर यांना मैदानात उतरवण्यात आलं. तर दुसरीकडं शिवसेना ठाकरे गटानं हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिलीय.


कोहळीकर आणि आष्टीकर या दोघा शिवसैनिकांना तिसऱ्या शिवसैनिकानं आव्हान दिलंय. बी. डी. चव्हाण हे ठाकरे गटाचे माजी शिवसैनिक आता वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेला उभे आहेत. त्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढलीय. खासदाराचा पत्ता कट करण्याची नामुष्की शिवसेना शिंदे गटावर आली. एवढं होऊनही भाजप बंडखोराचं आव्हान अजूनही कायम आहे. त्यामुळं हिंगोलीची निवडणूक आणखी रंगतदार झालीय.