Hoardings of Uddhav Thackeray And Prakash Ambedkar:  राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर औरंगजेबच्या (Aurangzeb) कबरीला भेट दिल्याच्या मुद्द्यावरुन थेट बॅनर्समधून निशाणा साधण्यात आला आहे. मुंबईत झळकलेल्या या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री हे बॅनर्स झळकावण्यात आले आहे. मात्र हे बॅनर्स कोणी झळकवले यासंदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी हे बॅनर्स रात्रीच उतरवले आहेत. या प्रकरणामध्ये कोणीही कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. या बॅनर्समुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले जातील असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.


माहिममध्ये झळकले बॅनर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या माहिम परिसरामध्ये बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त बॅनर्स झळकवले. 'औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे' अशा ओळी असलेलं बॅनर लावण्यात आलं आहे. हे वाक्य 'शिवरायांची जनता' म्हणत असल्याचंही बॅनरवर म्हटलं आहे. या वाक्याच्या उजव्या बाजूला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हस्तांदोलन करताना दिसत आहेत. तर या दोघांच्या मागे औरंगजेबचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच तळाशी #UddhavThackerayForAurangzeb असा हॅशटॅगही देण्यात आला आहे.



भाजपाने केलं ठाकरे गटाला लक्ष्य


17 जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्यासाठी गेले होते. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीनेही या मुद्द्यावरुन टीका केली होती. याच मुद्द्यावरुन भाजपाने उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य केलं होतं. उद्धव ठाकरे गटाची प्रकाश आंबेडकरांच्या या भेटीमध्ये काय भूमिका आहे असा सवाल भाजपाने विचारला होता. यासंदर्भात उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंना काही दिवसांपूर्वी पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारला असता आदित्य यांनी थेट उत्तर देणं टाळलं. आदित्य यांनी मला तुमच्याकडूनच या भेटीसंदर्भात माहिती मिळाली असून मी संपूर्ण माहिती घेऊन यासंदर्भात बोलेन असं म्हटलं होतं.  


या भेटीवर उद्धव काय म्हणाले होते?


उद्धव ठाकरेंना एका पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, "जेव्हा आमची युती होती तेव्हा अडणवाणी साहेब सुद्धा जिन्नांच्या दरग्यावर नतमस्तक झाले होते. नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. आता स्वच्छ आणि एका विचाराने पुढे जायची गरज आहे. लोकांना अडकवून ठेवण्यात अर्थ नाही," असं उद्धव ठाकरेंनी या भेटीसंदर्भात बोलताना म्हटलं.